जागृती मारुती मंदिर बद्दल
श्रीसमर्थ रामदासस्वामी स्थापित नवसाला पावणारा दक्षिणमुखी जागृत मारुती श्रीक्षेत्र गौडगांव बु।।, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर.
स्वामी समर्थाच्या पुण्यपावन अक्कलकोट तालुक्यात श्रीक्षेत्र गौडगांव बु।। हे दक्षिणमुखी मारुतीचे जागृत व मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र गौडगांव हे स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट पासून ११ कि. मी. आणि अक्कलकोट रेल्वे स्टेशनपासून २ कि. मी. अंतरावर आहे. या मारुतीची उपासना केल्याने अनेक भाविकांचे मनोकामना पूर्ण झालेले आहे. हे जागृत मारुती मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीचे आहे. हनुमंत अवतार रामदास स्वामीनी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीची मूर्ती शेवरी रंगाची आहे. या मारुती मंदिरास कळस आहे. हा मारुती दक्षिणमुखी असून त्याला एकमुख असून एकच डोळा आहे. हा मारुती गदाधारी आहे. या गदाधारी हनुमानाच्या दर्शनाने संकटे, समस्या, वास्तुदोष नाहीसे होतात. म्हणून या मारुतीस संकटमोचन मारुती म्हणतात. श्रीक्षेत्र गौडगाव येथील हा मारुती शेंडीधारी आहे. शेंडीधारी मारुती क्वचित असतो. या जागृत मारुतीच्या संपूर्ण शरीराभोवती शेपटी आहे. वा मारुतीच्या वारंवार दर्शनाने आपल्या शरीराभोवती शेपटीप्रमाणे एक अदृश्य संरक्षक कवच तयार होते. या मारुतीच्या डाव्या बाजूस शंकराची पिंड आहे. हे जागृती मारुती मंदिर हेमाडपंथी असून संपूर्ण बांधकाम कोरीव दगडात चुना व वाळूने केले आहे. सिमेंटचा कोटेही वापर नाही. संपूर्ण मंदिर दक्षिणमुखी आहे. मंदिराच्या दर्शनी महाद्वारावर हेमाडपंथी दगडी छत असून त्यावर प्रभू श्रीराम व सीतामाईस खांबावर घेऊन बसलेल्या हनुमानाची मोठी बैठी दगडी मूर्ती आहे.
जागृत मारुतीचा गाभारा छोटासा असून गाभाऱ्यात खाली वाकूनच प्रवेश करावा लागतो. गाभाऱ्यासमोर चौकात आवार आहे. या आवाराच्या डाव्या, उजव्या व समोरच्या बाजूस असलेल्या दगडी भितीत नऊ छोटे देव्हारे असून त्यात नऊ देवांच्या मूर्तीची स्थापना विश्वस्त समितीने केलेली आहे. या नऊ मूर्ती स्थापन करण्याचे कारण म्हणजे पूर्वी मारुतीची प्राणप्रतिष्ठापना करताना समर्थ रामदास स्वामीच्या मनात मूर्तीसमोरील आवारात नवग्रहाची स्थापना करण्याचा विचार होता पण त्यावेळी नवग्रहाची स्थापना झाली नाही. समर्थ रामदास स्वामीचा अपूर्ण संकल्प विश्वस्त समितीने नऊ देवतांच्या मूर्तीची स्थापना करून पूर्ण केला आहे.
पूर्वी गाभाऱ्यासमोरील आवारात विहीर होती. या विहिरीत स्नान करून भाविक मारुतीचे दर्शन घेत असत. या जागृत मारुती मंदिराच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले असून थोड्याच कालावधीत तेथे निसर्गरम्य वातावरण निर्माण होईल यात शंका नाही.
प्रत्येक गावात किमान एक तरी मारुती मंदिर आहे. पण जागृत मारुती फार कमी आहेत. श्रीक्षेत्र गौडगांव येथील मारुती जागृत असून तो भक्तांच्या अनेक मनोकामना पूर्ण करतो. ११ शनिवार, ११ मंगळवार श्रीक्षेत्र गौडगांव येथे येऊन मारुतीची पूजा करून मनातील इच्छा मारुतीसमोर व्यक्त केल्यास ११ शनिवाराच्या आतच मनातील इच्छा पूर्ण होते. हा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे. यामुळे शनिवारी व मंगळवारी श्रीक्षेत्र गौडगांव येथे लाखो भक्तगण दर्शनासाठी न चुकता येतात. त्यामुळे जत्रेचे स्वरूप येते.
शारीरिक व मानसिक पीड़ा कमी व्हाव्यात, आर्थिक संकट दूर व्हावे, नोकरी मिळावी, संततीप्राप्ती व्हावी, व्यापार भरभराटीस यावा, वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून असंख्य लोक श्रीक्षेत्र गौडगांव येथील मारुतीची उपासना करून फलप्राप्त करून घेत आहेत, फलप्राप्तीमुळे भाविक आनंदाने, स्वखुशीने या जागृत मारुतीस धन, अन्नधान्य, वस्तुरूपात यथाशक्ती देणगी देत आहेत. या देणग्यातून विश्वस्त समिती मंदिराचा जीर्णोद्धार करीत असून भक्त निवास व अन्नछत्रचे बांधकाम चालू आहे. सध्या शनिवारी व मंगळवारी अन्नदान केले जाते. अक्कलकोटपासून गौडगांवला जाण्याकरिता एस. टी. बसेस तसेच खाजगी वाहनेही आहेत. सोलापूरहून सिटी बसेसची सोय आहे. तसेच मेल, उद्यान व सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या अक्कलकोट
स्टेशन येथे थांबतात. तरी आपण मारुतीचे दर्शन घेवून पुनीत व्हावे.