॥ ॐ श्री हनुमते नमः ॥
श्री मारुती स्तोत्र
समर्थ रामदास स्वामी विरचित
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
संकटनिरसनं श्री मारुतीस्तोत्रम्
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥ १ ॥
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें
सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ॥ २ ॥
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥ ३ ॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ॥ ४ ॥
ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥ ५ ॥
ब्रह्मांडे माईली नेणो, आवळे दंतपंगती
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥ ६ ॥
पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ॥ ७ ॥
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ॥ ८ ॥
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९ ॥
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥ १० ॥
अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे
तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे ॥ ११ ॥
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहतां नसे ॥ १२ ॥
आरक्त देखिलें डोळां, ग्रासिलें सूर्यमंडळा
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ॥ १३ ॥
धनधान्य पशुवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४ ॥
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ॥ १५ ॥
हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ॥ १६ ॥
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू
रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ॥ १७ ॥
॥ श्री मारुती स्तोत्र समाप्त ॥
॥ इति श्री समर्थ रामदासकृतं संकटनिरसनं श्री मारुतीस्तोत्रं सम्पूर्णम् ॥